महावितरण च्या विज बिल वरील आकारण्यात येणाऱ्या चार्जेस बद्दल माहिती

 स्थिर आकार : (fixed charges):- ग्राहकाने वापर केला असो अगर नसो प्रत्येक ग्राहकाला स्थिर आकार त्याच्या जोडणीच्या प्रकारानुसार द्यावाच लागतो. वीज कंपनीला वीजपुरवठा देण्यासाठी पायाभूत सुविधांवर येणा-या खर्चासाठी ही रक्कम आकारली जाते.

विज आकार :- वीज आकार म्हणजे ग्राहकाने वापरलेल्या विजेची किंमत. ग्राहकाला वीज पुरविण्यासाठी जी वीज खरेदी किंवा उत्पन्न करावी लागते त्याची किंमत म्हणजे वीज आकार. सुरुवातीच्या युनिट्ससाठी विजेचा दर सर्वात कमी तर नंतरच्या युनिट्ससाठी तो वाढत जातो. परंतु ग्राहकाने हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक ग्राहकाची वीज आकारणी त्या त्या स्लॅबनुसारच केली जाते. जास्त युनिट्स वापरणा-या ग्राहकाला सर्वात जास्त दर सरसकट लावला जात नाही.


इंधन अधिभार (fuel adjustment charges):- इंधनाच्या (उदा. कोळसा, तेल किंवा नसíगक वायू) खरेदीच्या दरामध्ये जर वाढ झाली तर याची तफावत भरून काढण्यासाठी वीज कंपनीला जो जास्त खर्च करावा लागतो तो इंधन अधिभाराच्या रूपात कंपनी ग्राहकाकडून वसूल करू शकते. या उलट जर या किमतीत घट झाली तर त्याचा परतावा (credit)) देखील कंपनीला ग्राहकांना द्यावा लागतो. यासाठी लागणारा दर हा प्रत्येक महिन्याला वीज नियामक आयोगामार्फत ठरवला जातो.


विज शुल्क (electricity duty): ग्राहकाने वापरलेल्या विजेवर महाराष्ट्र सरकारकडून कर लावला जातो. या संबंधी महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचना (govt. notification) उल्लेख ग्राहकाच्या बिलाच्या मागील बाजूस दिलेला असतो.


व्हिलिंग आकार : हा आकार सर्व कंपन्यांना लागू होत नाही. जी कंपनी ग्राहकाला वीजपुरवठा करण्यासाठी दुस-या कंपनीचे वितरण जाळे उपयोगात आणते त्या करता कंपनीला जो आकार द्यावा लागतो. तो कंपनी ग्राहकाकडून वसूल करते.त्यालाच व्हिलिंग आकार असे संबोधले जाते. हा आकार प्रत्येक युनिटनुसार आकारला जातो.

क्रॉस सबसिडी चार्जेस :- ज्या ग्राहकाचे बिल ५०० युनिट्सपेक्षा जास्त असते त्यांच्याकडूनच पर युनिट हा आकार वसूल केला जातो. या वसूल केलेल्या जास्त आकारामुळे गरीब ग्राहकाला वीज दर कमी लावल्यास मदत होते. हे दरही आयोगाकडून मान्यताप्राप्त असतात. सर्व कंपन्या हे दर लावत नाहीत.


विलंब आकार किंवा डीपीसी :- जर ग्राहकाला आपले बिल नमूद केलेल्या अंतिम मुदतीच्या आत भरता आले नाही तर कंपनी त्याला विलंब आकार लावते.

Arrears किंवा थकबाकी :- ग्राहकाने आपले वीजबिल भरलेच नाही तर बिलात ते थकबाकी म्हणून नमूद केले जाते. यावर त्याला व्याज देखील भरावे लागते. व्याजदर आयोगाने ठरवून दिलेला आहे व तो सामान्यपणे १५ टक्क्यांपेक्षा जास्त असतो.


सुरक्षा अनामत (security deposit ):- ग्राहक वीज आधी वापरतो आणि त्याची रक्कम नंतर बिलामार्फत भरली जाते. म्हणून वीज कंपनी ग्राहकाच्या एका वीजबिल चक्राच्या सरासरी एवढी रक्कम सुरक्षा अनामत म्हणून घेऊ शकते. या रकमेवर वीज कंपनीला रिझव्‍‌र्ह बँकेच्या दराने व्याज द्यावे लागते व ते बिलांमध्ये वर्षातून एकदा नमूद केले जाते व त्या बिलातून तेवढी वजावट मिळते. या व्यतिरिक्त वीजबिल भरण्याची अंतिम तारीख किंवा बिल सवलतीची अंतिम तारीख देखील ठळक अक्षरात नमूद केली जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishesh)

वायरमन - एक संघर्ष कथा