पैसा टिकत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय ?

पैसा टिकत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय ?

"...काहीही करा साला, पैसा काय टिकत नाही यार" ही एक कॉमन तक्रार माझ्यासारख्यांना रोज ऐकावी लागते. धनप्राप्ती मजबूत प्रमाणात असूनदेखील  हे रडगाणं का असतं? मी याचा जरा सखोलपणे विचार केला. आणि मला काही गोष्टी निदर्शनास आल्या. त्या म्हणजे

१) अनावश्यकपणे वाढवलेलं Cost of living
२) ते Cost of living तसंच Maintain करण्यासाठी घ्यावं लागणारं कर्ज
३) मुलांचे अनावश्यक लाड
४) गरज नसताना केलेल्या ऑनलाईन खरेद्या
५) महत्वाकांक्षापूर्ततेचा आंधळा अट्टहास 

...ही त्यामागची पाच महत्वाची कारणे आहेत. आजारपण, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च ( किराणामाल, भाजीपाला, घरपट्टी, लाईट, मोबाईल इंटरनेटचं बील वगैरे) यासाठी येणार खर्च हे न टाळता येणारे आहेत (Unavoidable expenses) तरीही आपण वरील पाच गोष्टींच्या फेऱ्यात अडकत असाल तर प्रत्यक्ष लक्ष्मीमातेने तिजोरीत ठाण मांडून बसायचं ठरवलं तरीही तुम्ही तिची हकालपट्टी स्वत:च करत आहात हे लक्षात घ्यावे.

"अमुकच वसाहतीत घर हवं, अमुकच प्रकारचे कपडे-कार मी वापरणार कारण मी महत्वाकांक्षी आहे व मला हे हवंच आहे" ही वृत्ती बरेचदा कर्जबाजारीपणाकडे नेणारी ठरते व त्याचा शेवट पैसा संपण्यात होतो. आणि एकदा का तुम्ही Cost of Living वाढवलं की ते कमी करता येत नाही. माझ्या माहितीतील एकाने मला लहानपणीच सांगितलेलं अजून आठवतंय, "सचिन, फर्स्टक्लासचा प्रवास, रेमंडचे कपडे आणि पार्कर पेन हे वापरण्यापूर्वी दहादा विचार करावा....तिथून परत फिरता येत नाही हे विसरु नकोस"

"अंथरुण पाहून पाय पसरावेत" ही म्हण आजकालच्या १००% कर्ज उपलब्ध्दतेच्या जमान्यात अनेकांना "आऊटडेटेट" वाटेल हे नक्की पण सहज उपलब्ध होणारे कर्ज त्यासोबत अफाट रकमेच्या व्याजाच्या भरपाईसकट आलेलं असतं हे माणसाने विसरु नये....लोकं आंधळेपणाने आजकाल क्रेडीट कार्डचा वापर करतात ते देखील चुकीचे आहे, योग्य वेळात त्या रकमेची भरपाई केली नाही तर त्यावर चक्रवाढव्याजाने पैसे भरावे लागतात बॅंकेला हे विसरतो आपण....आपण आपली हौसमौज अवश्य पूर्ण करावी पण ती आपल्या आर्थिक आवाक्यात असेल तरच अन्यथा नाही. कर्ज ही गोष्ट जितकी सहजसाध्य व सोपी आहे तितकंच ते एक मायाजाळ आहे हे विसरु नये. मी स्वत: एकेकाळी या मायाजाळात अडकलो होतो, माझे बोल हे अनुभवाचे आहेत हे लक्षात घ्यावे.

"साला, मला एका ठिकाणी जायचं होतं, वुईथ फॅमिली...मित्रांकडे कार मागितली. एकानेही दिली नाही. तडक दुसऱ्या दिवशी बॅन्केत गेलो आणि ९०% लोन घेऊन तिसऱ्या दिवशी ह्य्न्डाई उभी केली दारात" हे बोलणारा मनुष्य मी याचि देही याचि डोळा बघितला आहे (तीन महिन्यांनी बॅन्केने गाडी ओढून लिलावात नेली आणि नाचक्की झाली तो भाग वेगळा ) गरज आणि छानछोकी यातली सीमारेषा आपण लक्षात घेतली तर कधीही उत्तम. हौस म्हणून कार खरेदी करायची आणि दारात उभी आहे म्हणून पेट्रोल घालून इथेतिथे फिरायचं आणि तो पांढरा हत्ती पोसायचा यासारखा वेडेपणा नाही, Especially मोठ्या शहरात जिथे फोन करताक्षणी, Online उबर-ओला कॅब उपलब्ध असतात तिथे कारसारखे "षोक" हवेतच कशाला? तुम्ही उच्चपदस्थ अधिकारी आहात, गरज आहे आणि तुम्हाला आर्थिकदृष्टीकोनातून कार खरेदी करणे (आणि मेंटेन करणे) परवडत असेल तर मात्र नक्की खरेदी करावी....

तुमच्या मासिक उत्पन्नातील किमान २०% ते २५% आपल्याला मिळालेलीच नाही असे समजून ती हिशोबात न धरता, ती संपूर्णपणे सुरक्षित बचतीकडे वळवल्यास पैसा टिकणारच हे लक्षात घ्या....ही एक सोपी ट्रीक आहे, ती अंमलात आणा. म्हणजे तुमचं मासिक उत्पन्न समजा २०,००० आहे तर आपल्याला १५,००० रुपयेच मिळालेले आहेत असं समजून उर्वरीत ५००० रुपये   गुंतवा अणि आपली स्वप्ने पूर्ण करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishesh)

वायरमन - एक संघर्ष कथा